विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ : मेसमधील विदारक स्थिती पाहून आमदार डॉ. नरोटे भडकले

63

“विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ : मेसमधील विदारक स्थिती पाहून आमदार डॉ. नरोटे भडकले

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या गंभीर निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार आज समोर आला. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विद्यापीठाच्या मुलांच्या वसतिगृहाला अचानक भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली असता, मेसमधील भयावह परिस्थिती पाहून त्यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला.
पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांनी निकृष्ट दर्जाचे जेवण, अस्वच्छता आणि मेसमधील अनेक समस्यांबाबत तक्रारींचा पाढाच वाचला. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी थेट स्वयंपाकगृहाची पाहणी केली. तेथे उघड्यावर पडलेले अन्न, गंजलेली भांडी, दुर्गंधी आणि सर्वत्र पसरलेली घाण पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
“विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी असा खेळ खपवून घेतला जाणार नाही,” असा सज्जड इशारा देत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मेस कंत्राटदार आणि विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तातडीने वसतिगृहाची स्वच्छता करून मेसची गुणवत्ता सुधारावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी भाजपा प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खट्टी, कुलसचिव हिरेकनजी, सिनेट सदस्य सतीश चिचघरे, रुपेंद्र गौर, स्वरूप तारगे आणि अरुण प्रकाश उपस्थित होते.