Home Breaking News गडचिरोली : मुख्य सचिवांच्या दौऱ्याची चाहूल; निद्रिस्त प्रशासन अचानक ‘ॲक्टिव्ह’

गडचिरोली : मुख्य सचिवांच्या दौऱ्याची चाहूल; निद्रिस्त प्रशासन अचानक ‘ॲक्टिव्ह’

547

• अहवाल सादरीकरणासाठी अधिकाऱ्यांची धावपळ, कर्मचाऱ्यांवर वाढला ताण

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : राज्याचे मुख्य सचिव तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल हे ६ व ७ जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध विकासकामांचा आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्याची चाहूल लागताच गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अचानक ‘ॲक्टिव्ह मोड’मध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे.
विविध विभागांमध्ये विकासकामांचे अहवाल, योजनांची आकडेवारी, प्रगतीपत्रके आणि सादरीकरणे तयार करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची लगबग सुरू आहे. अनेक कार्यालयांमध्ये कामकाजाचा वेग वाढला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्य सचिवांच्या दौऱ्यामुळे शनिवार-रविवारच्या सुट्टीतही अनेक कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामे पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा लागत आहे. त्यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाला असून सुट्टीचे नियोजनही विस्कळीत झाले आहे. काही विभागांमध्ये रात्री उशिरापर्यंत अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, मुख्य सचिव जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणार असले तरी अनेक शासकीय योजनांचा लाभ अद्यापही अपेक्षित प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याची चर्चा आहे. विविध कार्यालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता, कर्मचाऱ्यांना ओळखपत्रांचा अभाव, प्रलंबित प्रशासकीय प्रश्न तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी कायम आहेत.
मुख्य सचिवांच्या या दोन दिवसीय दौऱ्यात केवळ कागदोपत्री अहवालांवर समाधान मानले जाणार की प्रशासनातील वास्तव समस्यांवरही लक्ष केंद्रित केले जाणार, याकडे जिल्ह्यातील कर्मचारी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Don`t copy text!