Home Breaking News सावलीत बनावट सुगंधित तंबाखू कारखान्यावर धाड; ११.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘गडचिरोली कनेक्शन’...

सावलीत बनावट सुगंधित तंबाखू कारखान्यावर धाड; ११.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘गडचिरोली कनेक्शन’ उघड

238

सावलीत बनावट सुगंधित तंबाखू कारखान्यावर धाड; ११.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘गडचिरोली कनेक्शन’ उघड

लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर, :- चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने सावली तालुक्यातील रयतवारी येथे मोठी धडक कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या अवैध कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ११ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल, उत्पादन यंत्रसामग्री आणि वाहन जप्त करण्यात आले असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात गडचिरोली येथून कच्चा माल पुरवला जात असल्याचेही चौकशीत उघड झाल्याने ‘गडचिरोली कनेक्शन’ समोर आले आहे.
महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या सुगंधित तंबाखू उत्पादन व विक्रीवर बंदी घातलेली असतानाही सावली तालुक्यातील मौजा रयतवारी येथे मोठ्या प्रमाणात बनावट तंबाखू उत्पादन सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याआधारे ११ जून रोजी धाड टाकण्यात आली.
कारवाईदरम्यान विजय भिमाजी भांडेकर (वय ३३, रा. सामदा बु., ता. सावली) हा यंत्रसामग्रीच्या साहाय्याने प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करून त्याचे बेकायदेशीर पॅकिंग व विक्रीसाठी साठवणूक करताना आढळून आला. त्याला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपीने बनावट तंबाखू उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल व प्रतिबंधित साहित्य गडचिरोली येथील गोकुळनगर परिसरातील विनय गुप्ता याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. त्यामुळे या अवैध व्यवसायाचे जाळे जिल्ह्याबाहेरही विस्तारले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या कारवाईत पोलिसांनी ३ लाख २ हजार रुपये किंमतीचे HOLA व EAGLE हुक्का शिशा तंबाखूचे प्रतिबंधित पॅकेट्स, २९ हजार ४०० रुपये किंमतीचा १४७ किलो खुला सुगंधित तंबाखू साठा, २ लाख रुपये किंमतीची उत्पादन यंत्रसामग्री व पॅकिंग साहित्य तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली ६ लाख रुपये किंमतीची टाटा पंच कार जप्त केली. एकूण ११ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध गंभीर कलमान्वये सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सावली परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या अवैध तंबाखू कारखान्यांवर कारवाई झालेली असताना इतका मोठा कारखाना सुरू असतानाही स्थानिक पोलिसांना व अन्न व औषध प्रशासनाला त्याची माहिती कशी मिळाली नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. मानवी आरोग्याशी थेट संबंधित असलेला हा बेकायदेशीर व्यवसाय दीर्घकाळ सुरू राहिल्याने स्थानिक यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात सपोनि. दीपक काँक्रेटवार, सपोनि. झाडोकर, पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. संतोष निंभोरकर, पोउपनि. सर्वेश बेलसरे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
प्रतिबंधित तंबाखूविरोधातील या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यातील अशा रॅकेट्सवर पोलिसांचा करडा नजर असल्याचे दिसून येते.

Don`t copy text!