– आपदा विभागाचे प्रयत्न अपुरे ठरले
लोकवृत्त न्यूज
सावली. दि.२४ :- सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील MSCB कार्यालय परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास एक हरणी कुत्र्यांच्या हल्ल्यात सापडून दुर्दैवाने मृत्युमुखी पडली. जंगलातून भरकटलेली ही हरणी गावात आल्याचे लक्षात येताच काही कुत्र्यांनी तिचा पाठलाग सुरू केला. जीव वाचविण्यासाठी हरणीने आटोकाट प्रयत्न केला, मात्र कुत्र्यांच्या झुंडीसमोर तिची चाल कायम राहू शकली नाही.
कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणी गंभीर जखमी झाली. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने आपदा व्यवस्थापन समितीचे सदस्य मुकेश कीलन्नाके यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत हरणीला वाचविण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. काही वेळ कुत्र्यांच्या तावडीतून हरणीची सुटका करण्यात यश आले, मात्र जखमांमुळे तिने काही वेळातच प्राण सोडले.
ही घटना वनविभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना तत्काळ कळविण्यात आली. हरणीचा मृतदेह अधिक तपासासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे. आपदा व्यवस्थापन विभागाचे सदस्य नितीन पाल यांनीही यामध्ये सहकार्य केले.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हरणीचा जीव वाचविण्यासाठी आपदा विभागाच्या कार्यकर्त्यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य असून त्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #forestdepartment @वन विभाग )

