गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य उत्पादन वाढीसाठी शासन कटिबद्ध

121

गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य उत्पादन वाढीसाठी शासन कटिबद्ध
– मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ४ जून :– गडचिरोली जिल्ह्याला राज्यात मत्स्य उत्पादनाच्या आघाडीवर आणण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट आश्वासन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना सखोल सूचना दिल्या.
या बैठकीस जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, मत्स्य व्यवसाय उपायुक्त सुनील जांभुळे, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मंत्री राणे यांनी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनामधील मर्यादा व अडचणी जाणून घेतल्या. तलावांमधील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबवावी, अतिक्रमण हटवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि मत्स्य उत्पादनासाठी पूरक यंत्रणा उभारण्यात याव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
तसेच, मत्स्यव्यवसायिक व तलाव ठेकेदारांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मत्स्य व्यवसाय व पाटबंधारे विभागाने समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द देत, जिल्हा नियोजन मंडळामार्फत मत्स्य योजनांसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवण्याबाबतही चर्चा झाली. पेसा क्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांपर्यंतच योजनांचा लाभ मर्यादित राहावा, यावरही त्यांनी विशेष भर दिला.
गडचिरोली येथे शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगताना राणे यांनी राज्यस्तरीय नव्या योजनांची माहितीही दिली. या बैठकीत सहाय्यक आयुक्त समीर डोंगरे यांनी जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायावरील सादरीकरण केले.
या वेळी कृष्णा गजबे, रमेश बारसागडे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अमित राऊत, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे व नागपूर विभागातील सर्व मत्स्य व्यवसाय अधिकारी उपस्थित होते.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @NiteshNRane @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #FisheriesSector #Nagpur #Development #DistrictCollector Office )