पुलावरून वाहून जात असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी दिला नवजीव!
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 30 जून :- गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांची जलपातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून, पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. अशाच कठीण प्रसंगी कुरखेडा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका नागरिकाचा जीव वाचला आहे.
सती नदीवरील मुख्य पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात पूल बांधण्यात आलेला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने 29 जूनपासून कुरखेडा पोलिस स्टेशनच्या वतीने पुलाजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
30 जून रोजी अजय बाळकृष्ण रामटेके (वय 40, रा. श्रीरामनगर, कुरखेडा) हे आपल्या दुचाकीवरून सती नदीवरील तात्पुरत्या पुलावरून जात असताना, नदीच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्याच्या प्रवाहासह वाहून जाऊ लागले.
त्याच वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोउपनि. दयानंद भोंबे, सफौ शालिक मेश्राम व पोहवा शाम शेणकपट यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ कृती केली. त्यांनी दोरीच्या सहाय्याने धाडसी प्रयत्न करत अजय रामटेके यांना सुखरूपपणे बाहेर काढले व तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे दाखल केले.
ही धाडसी आणि मानवी जिवन वाचवणारी कामगिरी गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी रविंद्र भोसले, तसेच कुरखेडा पोनि. महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात पार पडली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, गडचिरोली पोलिसांनी नागरिकांना पावसाळ्यात नदी-नाल्यांवरील प्रवास काळजीपूर्वक व सजगतेने करण्याचे आवाहन केले आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police )










