पळस:
काय म्हणावे या बहराला?
सगळीकडे रखरखीत पानगळ
असताना
यानेच कसं काय धाडस केलं…
असं ऐन उन्हात उघडं-नागडं
फुलायला?
पाहा ना,
वरती आभाळ निळं आणि शांत आहे
आणि खाली हा रस्ता…
गावकुसाबाहेर जाणारा, धुळीने
माखलेला.
पण या दोघांच्या मध्ये
या पळसाने जो रंगांचा हलकल्लोळ
केलाय,
त्याला उपमा तरी कशाची द्यायची?
उन्हाचा चटका बसतोय हे खरंय,
पण या फुलांकडे पाहिलं की
मनातली दाहकता कुठल्या कुठे
पळून जाते.
हे केवळ फूल नाही,
तर या कोरड्या वाटेवर उमललेलं
एक ‘मोहित करणारं स्वप्न’ आहे.
कुणीतरी विचारलं-
“अशा उन्हात काय दिसतं तुला या झाडात?”
मी म्हटलं-
“मला त्यात मातीचं गाणं दिसतंय,
जे शब्दांशिवायही काळजाला
भिडतंय.”
कवयित्री : प्रियंका वाकडे
गडचिरोली
Kavyank stories











