Home Breaking News स्त्री-भ्रूण हत्या थांबवण्यासाठी एकजूट; गडचिरोलीत पीसीपीएनडीटी कार्यशाळा

स्त्री-भ्रूण हत्या थांबवण्यासाठी एकजूट; गडचिरोलीत पीसीपीएनडीटी कार्यशाळा

230

• कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर तज्ज्ञांचा भर, लिंग समतोल राखण्याचा निर्धार

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २३ :-  स्त्री-भ्रूण हत्या या गंभीर सामाजिक समस्येच्या निर्मूलनासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गडचिरोली येथे आयोजित पीसीपीएनडीटी कायद्यावरील एकदिवसीय कार्यशाळेत करण्यात आले. जिल्हा महिला व बाल रुग्णालयात पार पडलेल्या या कार्यशाळेत वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, आशा स्वयंसेविका, सामाजिक कार्यकर्ते तसेच खाजगी सोनोग्राफी केंद्र चालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
कार्यशाळेत गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या तरतुदी, अंमलबजावणीतील महत्त्वाचे मुद्दे आणि स्त्री-भ्रूण हत्या प्रतिबंधाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. लिंग गुणोत्तराचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी गर्भपात (वैद्यकीय समाप्ती) कायदा, सहाय्यित प्रजनन तंत्रज्ञान कायदा आणि सरोगसी (प्रतिनिधी मातृत्व) कायद्यांबाबतही उपस्थितांना विस्तृत माहिती देण्यात आली. संबंधित कायद्यांचे उल्लंघन झाल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईबाबत स्पष्ट सूचना देत नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए.पी. खानोरकर, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोकुडे आणि सामाजिक कार्यकर्त्या सविता गोविंदवार प्रमुख उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी कायद्याबरोबरच सामाजिक जागरूकता आणि सामूहिक जबाबदारी महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी विविध वैद्यकीय कायद्यांबाबत सविस्तर माहिती देत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करताना घ्यावयाच्या बाबी स्पष्ट केल्या. तसेच डॉ. छाया उईके, डॉ. प्रशांत पेंदाम, डॉ. नीलकंठ मसराम, डॉ. प्रशांत आखाडे, ॲड. तृप्ती राऊत आणि प्रतिज्ञा रामटेके यांनीही विषयानुरूप मार्गदर्शन केले.
कार्यशाळेदरम्यान पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीतील नोंदवही, नोंदणी प्रक्रिया, तपासणीतील दक्षता आणि गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर विशेष भर देण्यात आला. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात कायद्याबाबत जागरूकता वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि समाजात लिंग समतोल राखण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली.

Don`t copy text!