Home Breaking News ओळखपत्र हरवले की प्रशासन झोपले? गडचिरोलीत अनेक कर्मचारी ओळखपत्राविनाच कार्यरत

ओळखपत्र हरवले की प्रशासन झोपले? गडचिरोलीत अनेक कर्मचारी ओळखपत्राविनाच कार्यरत

94

शासन आदेशांकडे सर्रास दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संभ्रम

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहेत. ओळखपत्र न लावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूदही शासन आदेशात नमूद आहे. मात्र, प्रत्यक्षात गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये या आदेशांकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
जिल्ह्यातील विविध कार्यालयांमध्ये अनेक कर्मचारी कोणतेही ओळखपत्र न लावता कामकाज करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती खरोखर त्या कार्यालयातील कर्मचारी आहेत की इतर कोणी, हे ओळखणे सामान्य नागरिकांसाठी कठीण बनले आहे. कार्यालयात बसलेली व्यक्ती अधिकृत कर्मचारी आहे की नाही, याबाबतच संभ्रम निर्माण होत असल्याने कार्यालयीन पारदर्शकता आणि सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, अनेक शासकीय विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना अद्याप अधिकृत ओळखपत्रच देण्यात आले नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत संशय व्यक्त केला जात असला तरी प्रत्यक्षात यात त्या कर्मचाऱ्यांची कोणतीही चूक नसल्याचे बोलले जात आहे.

कारण, कंत्राटी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही संबंधित कंत्राटदार कंपनी किंवा कार्यालय प्रशासनाची असते. मात्र, अनेक ठिकाणी ना कंपनी गंभीर दिसत आहे, ना प्रशासन. परिणामी, शासनाच्या आदेशांची अंमलबजावणीच कागदावर राहिल्याचे चित्र आहे.

शासनाने स्पष्ट आदेश दिल्यानंतरही ओळखपत्र वितरणाकडे होत असलेले दुर्लक्ष प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे. कार्यालयीन शिस्त आणि नागरिकांचा विश्वास टिकवण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कार्यालयीन शिस्तीचा बोजवारा उडाल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.

दरम्यान, एखादा कर्मचारी शासकीय कार्यालयात ओळखपत्राविना कार्यरत दिसल्यास नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्याला ओळखपत्राबाबत जाब विचारावा तसेच याबाबत माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधींशी या क्रमांकावर  8888675643  संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील भागात संबंधित कार्यालयांचा खुलासा करण्यात येणार असल्याचे समजते.

‘लोकवृत्त न्यूज’च्या टीमने जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना भेट दिल्यानंतर हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सध्या संबंधित कार्यालयांची नावे जाहीर करण्यात आलेली नसली तरी आमची टीम जिल्हाभरातील कार्यालयांची पाहणी करत असून, पुढील भागात ओळखपत्राविना कार्यरत कर्मचारी आढळलेल्या कार्यालयांची नावे उघड करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
क्रमशः… पुढील भागात धक्कादायक खुलासे

Don`t copy text!