गडचिरोलीत विषारी पावडर प्राशन; सी-६० जवानाच्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू

1010

गडचिरोलीत विषारी पावडर प्राशन; सी-६० जवानाच्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : शहरातील गणेशनगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेचा विषारी पावडर प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्र दिनी घडली. सोनाली रविंद्र उसेंडी (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, त्या सी-६० दलात कार्यरत जवान रविंद्र उसेंडी यांच्या पत्नी होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली उसेंडी यांनी राहत्या घरी तांदळात टाकण्याची पावडर पाण्यात मिसळून प्राशन केले. काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचार सुरू असताना शुक्रवार दि. १ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गडचिरोली पोलिसांना दिली. त्यानंतर फिर्यादी व नातेवाईकांच्या जबाबावरून गडचिरोली पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.
घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे गणेशनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.